'शहीद भगतसिंग'
Shaheed Bhagat Singh मराठी लेख
शहीद भगतसिंग
एक असा क्रांतिकारी जो “फक्त शस्त्रांच्या जोरावर नव्हे तर शस्त्रांसोबत विचारांच्याही जोरावर जी क्रांती घडून येईल तीच क्रांती या हिंदुस्तानला खरं स्वातंत्र्य मिळवून देईल,” या विचारांनी प्रेरित झालेला होता आणि हाच गुण त्यांना इतर क्रांतिकारकांहून वेगळा बनवतो. “व्यक्ति को कुचलकर उसके विचारों को मारा नहीं जा सकता” या त्यांच्या एका वाक्यावरूनच आपल्याला त्याची प्रचिती येईल.
सेंट्रल असेम्बलीमध्ये केलेला बॉम्बहल्ला हा केवळ सूडबुद्धीने वा बदला घेण्यासाठी केलेला एक हल्ला नव्हता तर “बहेरों को सुनाने के लिये धमाके की जरूरत होती है” या भावनेतून भारतीय जनता आता जागृत झाली आहे आणि स्वातंत्र्य हा त्यांचा सर्वोच्च अधिकार आहे हा जनतेचा आवाज इंग्रज सल्तनीपर्यंत पोहोचवण्यासाठी एका सामान्य व्यक्तीने जुलमी राजवटीविरुद्ध केलेला तो एक एल्गार होता. या हल्ल्यामुळे ब्रिटीश सरकारच्या कानठाळ्या तर बसल्याच पण याचा आवाज इंग्लंडमध्येही घुमला आणि भारतीय स्वातंत्र्ययज्ञास मिळाला अजरामर असा ‘इन्कलाब झिंदाबाद’ चा स्वातंत्र्यमंत्र.
केवळ हौतात्म्य पत्करणे हेच एकमेव धोरण नव्हते तर मृत्युनंतरदेखील आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबामधून लोकांमध्ये जी क्रांतीची मशाल पेटली जाईल तीच या सबंध हिंदुस्तानला गुलामगिरीच्या पाशातून मुक्त करेल अशी त्यांची धारणा होती.
जालियनवाला बाग हत्याकांडांनंतर रक्तात भिजून लाल झालेली तिथली ती माती आणण्यासाठी १२ मैल पायीच चालत गेलेला अन तिची दररोज पूजा करणारा लहानपणीचा अवघ्या १२-१३ वर्षांचा छोटा भगत असो किंवा पुढे देव न मानणारा 'नास्तिक भगत' असो. गांधीजींच्या असहकार चळवळीतील एक कार्यकर्ता असो किंवा नंतर सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीतील’ एक तरुण तडफदार लढवय्या असो. कॉलेज मध्ये असतानाचा विविध पुस्तकांमधून क्रांतीची प्रेरणा घेणारा एक वाचनवीर असो किंवा मृत्युच्या काहीच क्षणांआधी लेनिनचे चरित्र वाचणारा कारावासातील एक कैदी असो. क्रांतीसाठी शस्त्र उचलणारा वीर असो किंवा त्याच क्रांतीसाठी पुस्तकांची कास धरणारा विचारवंत असो. मित्रांस कधी स्वाभिमानी तर कधी गर्विष्ट वाटणारा प्रसंगी आपले म्हणणे, आपले विचार त्यांच्यावर लादणारा यार भगत असो किंवा कधी एकांतात रमणारा, चिंतन करणारा राष्ट्रपुत्र भगत असो. 'नौजवान भारत सभेची' स्थापना करणारा एक कुशल संघटक असो किंवा विविध वर्तमानपत्रांमधून लेख लिहिणारा, आणि प्रसंगी पुढे कारावासात देखील विविध विषयांवर लेख लिहून आपली ही लेखनशैली जपणारा एक प्रबोधनकार व जागरूक लेखक असो. लालाजींच्या मृत्युचा प्रतिशोध घेण्यासाठी साँडर्सच्या हत्येत सिंहाचा वाटा उचलणारा पराक्रमी वीर असो किंवा सेंट्रल असेम्बलीत बॉम्बहल्ला करणारा ‘इन्कलाब झिंदाबाद’ चा नारा लगावणारा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक धाडसी नायक असो. कारावासात होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा सरदार असो किंवा तेथील भारतीय कैद्यांबाबत भेदभाव करून त्यांना अत्यंत निकृष्ठ दर्जाचे जेवण देणार्या अधिकार्यांविरुद्ध लढा देणारा, ११६ दिवस अन्नाचा कणही न खाता आपल्या सहकार्यांसोबत उपोषण करणारा एक सत्याग्रही असो. मित्रांमध्ये रमणारा, त्यांच्या हास्यात, आनंदात, दु:खात सामील होणारा, ५’१०” उंची लाभलेला, तरणाबांड, देखणा, आपलं तारुण्य देशप्रेमासाठी खर्ची घालणारा युवान भगत असो किंवा आयुष्याच्या अखेरीस ही, आम्हांला फाशी न देता ‘Shoot to Death’ ची मागणी करून एका क्रांतिकारकासारखे मरण मागणारा, वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी हसत हसत मृत्यूला अलिंगण देणारा,आणि आजही केवळ हिंदुस्तानातच नाही तर पाकिस्तानातही तेथील जनतेच्या मनांवर अधिराज्य गाजवणारा अमर हुतात्मा ‘शहीद भगतसिंग’ असो..!
खरंच किती ही तुमची विविध रूपं जी सदैव आमच्या स्मरणात राहतील अन अखंड प्रेरणा देतील आम्हांस तुमच्या स्वप्नातला तो भारत घडवण्यासाठी..!
🖋
- विश्वजीत राळे पा.
0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.