छत्रपती शिवराय आणि त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन- Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती श्री. शिवाजी महाराज

 

' छत्रपती शिवराय आणि त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन ' 

Chhatrapati Shivaji Maharaj 

छत्रपती श्री शिवाजी महाराज 

शिवराय आणि त्यांचा धर्म, त्यांचे हिंदुत्त्व आणि त्यांचा धर्माविषयीचा दृष्टिकोन याविषयी बरीच मत मतांतरे दिसून येतात. काहींना ते Secular म्हणजेच धर्म न मानणारे, धर्म निरपेक्ष फारफार तर सर्व धर्म समभाव विचारसरणीचे भासतात तर काहींना ते हिंदूपदपातशहा, गोब्राम्हणप्रतिपालक, हिंदुधर्मरक्षक, मुस्लिम धर्म संहारक वाटतात. या गोष्टीचा मात्र आपल्या पुढार्‍यांनी आपआपल्या परीने सोयीचा अर्थ लावून शिवरायांच्या कृपेने आजपर्यंत भरघोस दान आपल्या पदरात पाडून घेतलं, हे मात्र तितकंच खरं. मग ते दान मतांचं असो, सत्तेचं असो वा अन्य कुठलं.

माहितीच्या सागरात कितीही खोल डुबकी मारली तरी ज्याचा तळ सापडत नाही असे एक अथांग व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती श्री. शिवाजी महाराज. शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेण्यासाठीच्या लेखमालेतील हा पहिला लेख.. "छत्रपती शिवराय आणि त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन" 


'Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती श्री शिवाजी महाराज '

विश्वजीत राळे पा.




Chhatrapati-Shivaji-Maharaj
छत्रपती श्री. शिवाजी महाराज


छत्रपती शिवराय आणि त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन


        शिवरायांची धर्माविषयीची मते जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यास उभा राहतो तो त्यांच्या आयुष्याचा जवळपास ५० वर्षांचा कालखंड. त्या काळात घडलेल्या निरनिराळ्या घटना आणि त्या घटनांमधून उलगडलेल्या शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध छटा अन धर्माविषयीचा त्यांचा दृष्टिकोन.

        मग आठवतात रायरेश्वर येथील महादेवाला रक्ताभिषेक घालून आपल्या सवंगड्यांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्य स्थापणेची प्रतिज्ञा करणारे, "हे राज्य व्हावे ही तों श्रींची ईच्छा" मानणारे बाल शिवबा. तर कधी तुळजाभवानी मातेची उपासना करणारे, त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा असणारे शिवराय आठवतात. जेव्हा तत्कालीन गोव्यात पोर्तुगिजांनी सक्तीने हिंदूंची धर्मांतरे घडवून आणली तेव्हा तेथील भागावर आक्रमण करून त्या ख्रिस्ती धर्मगुरूंचा शिरच्छेद करण्यात आल्याची नोंद इतिहासात आहे. ज्या ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या तेथे पुन्हा मंदिरेही बांधण्यात आलेली आहेत. औरंगजेब बादशाहने जेव्हा हिंदूंवर जिझिया नावाचा अन्यायकारक कर लादला तेव्हा महाराजांनी 'कुराण' चा दाखला देत हा कर कसा अन्यायकारक आहे याविषयीचे एक खरमरीत पत्र बादशाहाला धाडले. स्वधर्मावर झालेल्या आक्रमणाला त्यांनी जशास तसे उत्तर दिल्याचे आढळते. या घटना जितक्या खर्‍या आहेत तितकंच हे देखील खरं आहे, की परधर्माविषयी ही असलेला कमालीचा आदर त्यांच्या कृत्यांतून दिसायला मिळतो. आपल्या सैन्यात असलेले सर्व जातीधर्माचे लोकं याचा दाखला आहेत. मंदिरांबरोबरच अनेक दर्ग्यांना दानधर्म केल्याचे देखील उल्लेख मिळतात. सुरतेवरील छाप्यादरम्यान "कुराणची प्रत मिळाली तर ती मुस्लिम सैनिकाकडे सुखरूप सुपूर्द करा, मशिदींचे संरक्षण करा" अशी सक्त ताकीद दिल्याचे अनेक पत्रांमध्ये नमूद आहे. यावरून त्यांचा स्वधर्माविषयी असलेला कमालीचा आदर आणि परधर्माविषयीची सहिष्णुता दिसून येते.

        महाराजांच्या बर्‍याचशा महत्त्वाच्या स्वार्‍या, बर्‍याचशा मोहिमा या अमावस्येच्या काळोख्या रात्री झालेल्या दिसतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शत्रूला गाफिल ठेवून हल्ला करणे हा त्यामागचा हेतू. गनिमी काव्याचा हा एक भाग जरी असला तरी महाराज हे जास्त काही मुहूर्त तिथी च्या भानगडीत अडकलेले दिसून येत नाहीत. धर्माकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती. तिथी मुहूर्त बघत, अमावास्येला अपवित्र मानत जर स्वार्‍यांची, मोहिमांची आखणी झाली असती तर कित्येक मोहिमा या अयशस्वी झाल्या असत्या. आपला पुत्र पालथा जन्मला तेव्हा "पालथा जन्मला म्हणून काय झाले, आता हा दिल्ली पालथी घालेल" हे त्याचे उद्गार बरेच काही सांगून जातात. ज्या धर्मात 'समुद्रोल्लंघन' म्हणजे पाप मानले जाई, त्या धर्मातील हा एक राजा स्वत:चे एक सक्षम आरमार बनवतो, समुद्रावर आपले वर्चस्व स्थापित करतो, समुद्री शत्रूंवर दहशत बसवतो.. किती आश्चर्यकारक अशी ही घटना. संपूर्ण मध्ययुगाच्या कालखंडात आरमाराची निर्मिती करणारा, सागरी सैन्य बाळगणारा, हिंदुस्थानातील एकमेव राजा म्हणून, 'Father of Indian Navy’ म्हणून शिवरायांचा नामोल्लेख आदराने केला जातो. जातीपातींमध्ये विभागल्या गेलेल्या समाजात, श्रेष्ठ कनिष्ठ भेद बाजूला सारून, उच्च वर्णियांसोबत खालच्या वर्गातील देखील समुदायांच्या हाती शस्त्र देऊन स्वराज्य निर्मितीच्या मंगल कार्यात अवघ्या अवघ्यांना सामावून घेण्याचे दिव्यत्त्व त्यांनी पार पाडले. शिवकालापूर्वी कित्येक वर्ष आणि शिवकालानंतरची काही वर्षे सोडली तिथपासून ते आजपर्यंत पाहता जातीपातींमधील असलेला पराकोटीचा हा भेदभाव, आपांपसातील द्वेष, त्यात उत्तरोत्तर होणारी वाढ पाहता त्यांचा तो निर्णय किती महत्त्वपूर्ण होता याची जाण होईल. खुद्द शिवरायांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. राज्याभिषेकसमय प्रसंगी त्यांना झालेला विरोध समाजातील धर्मांधळेपणाची जाणीव करून देतो. तरीही त्यांनी स्वधर्माला विकृत न ठरवता चार चौकटींत अडकलेल्या धर्माला 'धर्मासुधारणा चळवळी' द्वारे नवसंजीवनी देण्याचे कार्य केले. बेगडी पाशांत अडकून पडलेल्या धर्माला त्यांनी त्यांच्या विचारांनी नवी दृष्टी दिली. सक्तीने बाटवून मनाविरुद्ध परधर्मात धर्मांतर झालेल्यांना, स्वधर्मात येण्याची सारी दारे बंद असताना, एक राजा हा सर्व विरोध झुगारून अशा व्यक्तींना स्वधर्मात परत घेतो हे एक किती मोठे युगप्रवर्तक पाऊल म्हणता येईल ! सरनौबत नेतोजी पालकरांना त्यांनी केवळ स्वधर्मातच घेतले नाही तर, आपल्या मुलीचा विवाह नेताजींच्या मुलाशी लावून दिला. हा निर्णय आज विसाव्या शतकातील आधुनिक भारतात देखील किती क्रांतिकारक वाटतो. ज्या महापराक्रमी पहिल्या बाजीराव पेशव्यांना आपल्या मुलाला स्वधर्मात घेण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करूनदेखील निराशेला सामोरे जावे लागले त्यापूर्वी जवळपास ५० वर्षांआधी शिवरायांनी उचललेले हे पाऊल किती क्रांतिकारक होते याची कल्पना येते. असाच एक उल्लेख बजाजी नाईक निंबाळकरांचा आढळतो. त्यांनाही शिवरायांनी स्वधर्मात घेवून आपल्या मुलीला निंबाळकरांची सून बनवल्याचे उल्लेख आढळतात. परंतु जाणकारांमध्ये या घटनेबाबत एकमत नाही.                   

        शिवरायांच्या हिंदुत्त्वाविषयी एका वाक्यात सांगायचंच झालं तर ते धर्माभिमानी होते पण धर्मांधळे नव्हते, ते धार्मिक होते परंतु धर्मभोळेपणाला त्यांच्या ठिकाणी जागा नव्हती. स्वधर्माचा सार्थ अभिमान बाळगून परधर्माला सहिष्णूपणे पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या जगासाठी एक अखंड प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचा धर्माभिमान त्यांनी रयतेची उपासमार करून आपल्या पोरबायकांच्या नावाने मोठमोठ्या वास्तु बांधण्यात, गडगंज संपत्ती कमावून ऐशोआरामात जगण्यात वाया नाही घालवला. तर  प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी होती ती 'रयत'. आणि त्या रयतेचे संगोपन करणे हा आपला प्रथम धर्म आणि म्हणूनच 'छत्रपती' ही पदवी रयतेवर न्यायाचं, ममतेचं, समतेचं छत्र धरण्यासाठी..! म्हणूनच तर आज जवळपास ४०० वर्षांनंतरही ते एक अखंड प्रेरणास्त्रोत आहेत.

        आज समाजात धर्माची आपापल्या सोयीप्रमाणे व्याख्या करणारे अनेक मिळतील. त्यांना ठणकावून धर्माची समज देता यायला हवी. मग तो कुठलाही धर्म असो. दर ५-५ वर्षांनी या व्याख्या बदलत ही जातील. त्यासाठी जाण हवी 'शिवराय' या मंत्राची. कारण 'शिवराय' म्हणजे केवळ एक इतिहास नसून आयुष्याच्या प्रवासातील प्रत्येक वाटेवर अन त्या वाटेवरच्या प्रत्येक पावलागणिक जीवनाला दिशा देण्यासाठी लागणारा जगण्यासाठीचा एक मूलमंत्र आहे..!   

  

🖋

- विश्वजीत राळे पा.



'छत्रपती शिवराय आणि त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन'

'Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती श्री शिवाजी महाराज'

विश्वजीत राळे पा.

 

Post a Comment

1 Comments

Offensive, spam comments are strictly prohibited.