' एवढंच एक मागणं '
Marathi Kavita मराठी कविता
महाराष्ट्रातील सद्यस्थिती
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात अनेक धक्कादायक, सुरूवातीला मजेशीर वाटणार्या अन नंतर तितकाच वैताग आणणार्या घटना घडल्या. खाकीतल्या अन बिना-खाकीतल्या अधिकार्यांनी आपल्यावरील झालेले घोटाळ्यांचे आरोप झाकण्यासाठी एकमेकांवर दोष ढकलण्यास सुरुवात केली. यात मंत्रिमंडळ तरी कसे शांत बसेल, मग त्यांचेही खंडणीचे उद्योग बाहेर यायला सुरुवात झाली. आणि मग विरोधकांनाही पुन्हा येईन ची स्वप्ने पडू लागली. यात आणखी भर म्हणून की काय, टीव्ही चॅनेल्स ने सुद्धा बातम्यांद्वारे Breaking News च्या नावाखाली आमच्या मनोरंजनात भर घातली आणि चालू झाला TRP चा नवा बाजार..!
गेल्या वर्षभरातील महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारी, जरी मजेशीर वाटत असली तरी वास्तवाचे भयाण चित्र दाखवणारी ही कविता..!
"राजकारण"
एवढंच एक मागणं
राजकारणाच्या फडावरती रोज नवी भांडणं
वैताग आलाय आता, बास करा की राव, एवढंच एक मागणं..!
खाकीतल्या मंडळींचा ढळलाय तोल
एकमेकांना दोष देत म्हणती आम्हीच थोर
जनतेने कुणाकडं करायचं आता न्यायाचं मागणं
राजकारणाच्या फडावरती रोज नवी भांडणं..!
खंडणीच्या आरोपामुळं सारं मंत्रिमंडळ ठप्प
जनतेचा 'मंत्री-मुख्य' मात्र मूग गिळून गप्प
मतीचे वाजले बारा आता काकांच्या डोक्याला दुखणं
राजकारणाच्या फडावरती रोज नवी भांडणं..!
'पुन्हा येईन' च्या स्वप्नासाठी रोज नवी खेळी
रंगू लागली खलबतं रात्रीस वेळी अवेळी
सत्तेच्या लोभापायी रोज नवीन शक्कल लढवणं
राजकारणाच्या फडावरती रोज नवी भांडणं..!
टीव्ही चॅनेल्स ला लागलेत TRP चे डोहाळे
रोज नवी बातमी अन यांचे नवीन घोटाळे
ब्रेकींग-न्युजच्या हेडलाईनवर आमचं रोज डोळे फाडून बघणं
राजकारणाच्या फडावरती रोज नवी भांडणं..!
वैताग आलाय आता, बास करा की राव, एवढंच एक मागणं..!
🖋
- विश्वजीत राळे पा.
"एवढंच एक मागणं"

0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.