उत्तम कांबळे- एक फिरस्ती लेखक व पत्रकार
विश्वा म्हणे..!
| उत्तम कांबळे |
उत्तम कांबळे- एक फिरस्ती लेखक व पत्रकार
साधारणपणे २०१०-११ सालची गोष्ट. बहुधा नववीत
होतो मी. महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन
करण्यात आले होते. त्यादिवशी उत्तम कांबळे यांना प्रत्यक्षात ऐकण्याची संधी
मिळाली. त्यांना ऐकण्याची उत्सुकता तर होतीच. ‘आई समजून घेताना’ या विषयावर जवळपास दोन तास त्यांनी व्याख्यान दिले. आणि ते दोन तास कधी
संपले याची जाणीव सुद्धा झाली नाही. वेळ मर्यादा ओलांडून आणखी त्यांना ऐकावे असे
मनोमन वाटत होते. त्यांचे सोपे शब्दांत बोलणे श्रोत्यांच्या मनाला भावत होते.
साध्या सोप्या शब्दांची निवड, जास्त पल्लेदार वाक्य न वापरता
केलेली वाक्यरचना यामुळे श्रोत्यांना देखील ते आपलेसे वाटत होते. ‘आई समजून घेताना’ या विषयावर बोलताना ते आपले अनुभव
कथन करत होते. त्याचवेळी त्या काळातील आई आणि सध्या बदललेले आईचे स्वरूप याविषयीची
तुलना देखील त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. विषयाचे भान समजून सांगताना श्रोते
देखील गंभीर होत होते. पण त्याचबरोबर अंगभूत असलेल्या विनोदी शैली मुळे आपल्या मिश्किल विनोदांनी
श्रोत्यांना ते खळखळून हसवत होते. आपल्या जीवनातील गमती जमती ते सांगत होते. ‘माझी आई व आता माझ्या पोरांची आई’ यांतील तुलना
करताना बऱ्याच गमती जमती त्यांनी सांगितल्या.
ग्रामीण
भागात गरिबीत वाढल्यामुळे संघर्षमय जीवन जगत असताना जीवनाच्या विविध टप्प्यांवर
त्यांच्या भाषेलाही तसा साज चढला होता. त्यांची भाषा देखील ग्रामीण ढंगाने नटलेली जाणवत
होती आणि त्यामुळेच ती श्रोत्यांना आपलेसे करत होती.
आमच्या घरी ‘सकाळ’ पेपर यायचा. रविवारी त्यात ‘सप्तरंग’ नावाची एक छान वाचनीय पुरवणी असायची. या सप्तरंग पुरवणीतून ‘फिरस्ती’ या सदरात त्यांचे लेखन वाचायला मिळायचे.
विविध समस्यांवर मात करत लढणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखमालेतून त्यांनी
रेखाटल्या आहेत. त्यातल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड
अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झालं आहे. मला आठवतंय की
बऱ्याचदा सप्तरंग पुरवणीतील ‘फिरस्ती’
सदर हे माझ्याकडून पहिले वाचले जायचे. त्यात त्यांनी वेगवेगळे अनुभव कथन केलेले
असत. या सदरात अनेक रोचक आणि रंजक प्रसंग लिहून वाचक प्रबोधन करण्याचे काम त्यांनी
केलं. समाजात वावरत असताना त्यांना भेटलेली निरनिराळी माणसे, व्यक्ती, निरनिराळे प्रसंग यांचे चित्रण
शब्दांद्वारे खूप मस्तपणे ते मांडत. तो प्रसंग वाचताना आपण प्रत्यक्ष तेथे आहोत
याचा भास होई. ही जादू होती त्यांच्या लेखनात.
संकटांवर मात करीत यश मिळवणाऱ्यांच्या जिद्दीच्या कथा ‘फिरस्ती’ च्या
माध्यमातून त्यांनी समाजासमोर मांडल्या. ‘फिरस्ती’तून त्यांनी अशी माणसे समोर आणली की जी प्रत्येक
श्वासासाठी एक महालढाई करतात. रस्त्यावर जुन्या चपला शिवणारा शिक्षक असेल, चार बहिर्या लेकींची आई असेल, पोट भरण्यासाठी
उंदीर घुशी खाणारे लोक असतील किंवा परिस्थितीच्या मानगुटीवर बसून तिला आपल्या
मनासारखं चालायला लावणारे असतील हे सारे नायक हे या फिरस्तीतून समोर आले. ज्यांनी
खचलेल्यांना उभारी दिली..जे न हारता लढले..ज्यांनी वाचकांना खेचून विचार करायला
भाग पाडलं.. विधायक बनवलं.
एखाद्या व्यक्तीच्या संघर्षाचे वर्णन करताना
नकळत वाचक असलेल्या माझे डोळे देखील पाणवल्याचे मला आठवते. पत्रकार, संपादक, लेखक, अशी ओळख असणारे
उत्तम कांबळे यांनी विविध पदे भूषवली आहेत. ठाणे येथे झालेल्या ८४ व्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले. सकाळचे सामान्य
बातमीदार ते मुख्य संपादक असा त्यांचा हा प्रवास बरेच काही शिकवून जातो. त्यांनी केलेल्या
संघर्षाचीही चर्चा होते. अगदी कंपाउंडर, हमाल, बांधकाम मजूर, पेपर विक्रेता यासारखी कामे करत
त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती हलाखीची,
हातावर पोट चालणारं घर. परिस्थितीचे चटके
त्यांच्याही वाट्याला आले. तरी त्यावर मात करत त्यांनी परिस्थितीलाही गुडघे
टेकायला भाग पाडले.
कोल्हापूर मधील
टाकळीवाडी येथे त्यांचा जन्म झाला. अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत त्यांनी आपले
शिक्षण पूर्ण केलं. बातमीदार ते संपादक अशा विविध पदांवर काम करत असतानाच त्यांचे
लेखन बहरले. १९८४ साली ठाण्यात झालेल्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी इतरही अनेक साहित्य
संमेलनाची अध्यक्षपद भूषवली आहेत. विविध पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आलेला
आहे. पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले. पत्रकारितेसाठी जवळपास ६० हून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
तसेच आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, आषाढी पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, प्रबोधन
मित्र पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लोकजागर पुरस्कार, समता पुरस्कार, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार असे विविध संस्थांचे ८० हून अधिक
पुरस्कार त्यांना मिळाले आहे.
विविध लेखांच्या माध्यमातून त्यांनी तरुणाईसाठी देखील मोलाचे मार्गदर्शन
केलेले आहे. “तरुणांनी प्रथम स्वत:ची ध्येये नक्की
करावीत. कुठं जायचं, कसं जायचं, कुठं
थांबायचं हे आधी ठरवा. जगाची दिशा ओळखा. जिकडं कुणी फारसं जात नाही, असं अस्पृश्य क्षेत्र निवडा. स्पर्धा कमी आहे, अशी
नवी दिशा शोधा.उगाळून गुळगुळीत झालेली विचार
पद्धती सोडा. प्रयत्नवाद धरा. कालबाह्य प्रथा, परंपरा
बदला. बंडखोर वृत्ती जोपासा. ज्येष्ठांनो, तरुणाईला मित्र
बनवा. नव्या युगाची हाक ऐका. देवभोळेपणा सोडा. अनुभवाचे बोल ऐकवा, पण नव्याची वाट अडवू नका,” यांसारखे विचार त्यांनी
आपल्या वाचकांसमोर मांडले.
आपल्या लेखणीतून माणसांच्या कथा रंगवणाऱ्या
उत्तम कांबळेंनी विद्रोहाचा रंग गडद करण्याचं काम केलं. त्यांची पत्रकारिता ही
सामान्यांसाठी होती. त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारताना सर्वसामान्यांना
केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. साधी-सोपी वाक्यरचना,
सामान्यांच्या बोलीतले शब्द, काळाच्या प्रवाहानुरूप बदलणारी
लेखन शैली इत्यादी अनेक पैलू हे त्यांच्या लेखनशैलीतील वैशिष्ट्य होय. अगदी
पाण्यासाठी पायपीट करूनही पाण्यापासून वंचित राहणाऱ्या समाजाचे प्रश्न त्यांनी
आपले लेखसंग्रह आणि इतर साहित्यातूनही तितक्याच गंभीरपणे मांडले.
मराठी
साहित्याला ग्रामीण साहित्याची समीक्षा देणाऱ्या उत्तम कांबळेंनी गाव-खेड्यातलं
जीवन आणि गावकुसा बाहेरच्या लोकांचे प्रश्न बोलीच्या सहजतेने मांडले. म्हणून
ते समाजातील विविध लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. पत्रकार म्हणून उत्तम कांबळे
यांच्या लेखनाची व्याप्ती लेख, अग्रलेख,
बातमी यापलीकडे जाऊन कथा, कादंबरी,
कविता इत्यादी साहित्य क्षेत्रामध्येही सहजतेने वावरताना दिसते. सकाळमध्ये त्यांनी
लिहिलेले ‘फिरस्ती’ हे सदर त्यांच्या
लेखनाची रोज एक वैशिष्ट्ये आपल्यासमोर आणतं. घटना,
घडामोडींकडे बघण्याचा पत्रकाराचा दृष्टिकोन आणि रोचकपणे त्या घटना, घडामोडी मांडण्याची सहज शैली त्यांच्याकडे होती. म्हणून त्यांचे लेखन
सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. ‘लढवय्यांच्या मुलाखती’ घेणारे उत्तम कांबळे यांनी तात्यासाहेब शिरवाडकर,
नारायण सुर्वे आणि बाबुराव बागुलांच्या घेतलेल्या मुलाखती आशय- विषयाच्या अंगाने
समृद्ध वाङ्मयाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून आजही दखल घेण्यासारखे आहेत.
🖋
- विश्वजीत राळे पा.
उत्तम कांबळे
Uttam Kamble
विश्वा म्हणे..!

0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.