मायमराठी - जागतिक मराठी भाषा दिवस


'मायमराठी'

जागतिक मराठी भाषा दिवस 

 २७ फेब्रुवारी.. ज्ञानपीठ , साहित्य अकादमी यांसारख्या विविध पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवणारे मराठी राजभाषेतील एक अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समिक्षक वि. वा. शिरवाडकर  म्हणजेच  'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिन आणि त्यांनी मराठी भाषा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल साजरा केला जाणारा हा 'जागतिक मराठी भाषा दिवस'..त्यानिमित्त, या माझ्या मायबोलीने अगदी बालवयापासून आम्हांवर केलेले विविध संस्कार, तिच्याविषयी आमचे असलेले अतोनात प्रेम, तिची थोरवी तसेच तिची सद्यस्थिती यांची सांगड घालून रचलेली ही प्रस्तुत कविता..'मायमराठी'


जागतिक मराठी भाषा दिवस 

मायमराठी







मायमराठी


 जरी भाषा या बहुत । लळा लावे ती एकच ।।

करे संस्कारही तीच । मायमराठी ।।

 

ओठांवर रेंगाळतो । तिचा अवीट गोडवा ।

ध्वनी तिचा तो बरवा । मनी साठवूया ।।

 

काय सांगू तिचा साज । काय वर्णू तिचा ढंग ।

करुनिया तिचा संग । धन्य झालो ।।

 

किती न्यारे तिचे रुप । कधी वाटते मधुर ।

कधी वाटे धारधार । शस्त्रापरि ।।

 

मायमराठी ही आता । होई स्वगृही परकी ।

भरे उरात धडकी । हाल पाहुनिया ।।

 

विश्वा म्हणे घेवू । मायमराठीचा ध्यास ।

नको दुजा अट्टहास । आणिक येथे ।।

 

दुमदुमवू जयघोष । नाद विश्वव्यापी सारा ।

घुमवू जयजयकारा । मराठी मराठी ।।


🖋

- विश्वजीत राळे पा.




जागतिक मराठी भाषा दिवस

मायमराठी

विश्वजीत राळे पा.

Post a Comment

0 Comments