माझी कसबा गणपती भेट
![]() |
| गाभाऱ्यातील श्रींची मूर्ती |
![]() |
| मंदिराचा दर्शनी बाह्य भाग |
माझी कसबा गणपती भेट
१३ सप्टेंबर २०२२:
सकाळी सकाळी लवकरच मित्राचा फ्लॅट सोडला. आजही पावसाच्या हलक्या सरी बरसतच होत्या. त्यामुळे धीम्या गतीने का होईना मी मार्गक्रमण करून अंतर कापण्याचा प्रयत्न करत होतो. एव्हाना ८ वाजले होते. कॉलेज सुरू व्हायला अजून जवळपास ३ तासांचा अवधी बाकी होता. आज अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ व पावन योग असल्याने दिवसाची शुभ सुरुवात व्हावी यासाठी मी गाडीची दिशा थोडी बदलली आणि थेट पोहोचलो कसबा गणपतीच्या मंदिर स्थानी.
बाहेरूनच दिसणारे ते नयनरम्य मंदिर, त्याबाजूने असलेली दगडी भिंत व त्यासभोवतीची लाकडी कलाकुसरीने सुशोभित असणारी गॅलरी बघताच क्षणी नजरेत भरत होती. मोगऱ्याच्या सुवासाने परिसर दरवळून निघाला होता. मंदिराच्या पश्चिम द्वारातून प्रवेश करताच लाकडी सुंदर नक्षीकाम असलेल्या सभामंडपाने लक्ष वेधून घेतले. त्यात मंद प्रकाशात केलेली विद्युत रोषणाई अधिकच आकर्षक वाटत होती. सभामंडपातील ८ खांबांवर असणाऱ्या ८ अष्टविनायकांच्या प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या. मंदिरातील ते लाकडी खांब, सभामंडप, त्यावर असलेले उत्कृष्ट नक्षीकाम मध्ययुगीन कालखंडातील स्थापत्य शैलीची साक्ष म्हणून आजही उभे होते.
मंदिरात अगदी तुरळकच गर्दी दिसत होती. मंदिरातील शांततेमुळे वातावरण प्रसन्न वाटत होते. गाभाऱ्यात प्रवेश करताच दिसणारे दगडी शैलीतील नक्षीकाम शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. मुख्य गाभाऱ्यात नजरेच्या अगदी समोर असलेली 'श्रीं'ची आकर्षक, सुबक मूर्ती नजर खिळवून ठेवणारी होती. 'तांदुळ' स्वरूपातील म्हणजेच हात- पाय इ. अवयव नसणारी ही मूर्ती बहुधा पुणे शहरातील या प्रकारातील एकमेव मूर्ती असावी. मूर्तीच्या डोळ्यांत चमकणारे हिरे व नाभितील माणिक मूर्तीच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते. नतमस्तक होऊन बाहेर येताना बाजूलाच असलेले 'विठ्ठल- रखुमाई', शिवलिंग, नंदी, दत्त यांचे दर्शन घेतले. मंदिर प्रदक्षिणा घालताना दगडी स्थापत्यात बांधलेले ते मंदिर अत्यंत सुंदर भासत होते. दगडी दीपमाळ नजरेत भरत होती. पारंपरिक पद्धतीचे सभामंडप, गर्भगृह, गोपूर पद्धतीचे शिखर सारेच अतुलनीय होते. शिल्पकलेेतील कलाकुसर खरोखरच वाखाणण्याजोगी होती.
सभामंडपात काही वेळ बसून 'श्रीं'ची मूर्ती एकटक न्याहाळत बसलो असतानाच बॅग मधील वही-पेन काढून लिहिण्याचा मोह झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब जेव्हा पुणे जहागिरीचा कारभार सांभाळत होत्या, त्याकाळी म्हणजेच इ.स. १६२६ च्या सुमारास या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ज्यावेळी मुरार जगदेवने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला, पुणे बेचिराख केले त्यावेळी झालेल्या एका दृष्टांतानुसार ही मूर्ती त्यांना सापडली अशी आख्यायिका आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना करून एक सुंदर सुबक असे देखणे देवालय बांधल्याचे दाखले इतिहासात मिळतात. या गणेशाच्या आशीर्वादानेच 'पुणे' शहर पुन्हा नव्याने वसवले गेले. म्हणूनच आजही पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी 'अग्रपुजेचा मान' हा पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा पेठेतील या श्रींचा.! नंतर पेशवे काळात लाकडी कोरीव छत, स्वर्गमंडप उभारण्यात आला.
लिहित असतानाच एका चिमुकलीने माझ्या तळहातावर मोदकाचा प्रसाद देवून लिहिण्याच्या तंद्रीतून जागे केले. आसपासच्या काही नजरा "हा काय लिहीत असावा असा या मंदिरात" म्हणून कुतूहलाने पाहत होत्या. मंदिरातील नामघोष व मंत्रोच्चाराचा जोर वाढत चालला होता. घड्याळात १०.३० वाजले होते अन् माझी पावले कॉलेजकडे जाण्यासाठी वळली होती.
🖋
- विश्वजीत राळे पा.



0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.