कोरोना काळातील शिकवण..!
खरंच लाज वाटते आपल्या सर्वांची आणि आपल्यासारख्या जिवंत प्रेतांवरती राज्य करणाऱ्या त्या सर्वांची ज्यांनी आपल्या आयुष्यातील दर ५-५ वर्षे वाया घालवून केवळ भावनांच्या राजकारणाचा उच्छाद मांडला, दिलेल्या साऱ्या वचनांची लक्तरे वेशीवर टांगून..!
भावना..तस पाहिलं तर भावना या महत्त्वाच्या. पण कोण विचारतं तुमच्या त्या भावनांना जेव्हा या शरीराचं अस्तित्वच संपुष्टात येण्याच्या मार्गावर असेल.शरीर असेल तरच तिथे भावना टिकतील. इतर वेळी मेलेल्या आम्हा जनतेने राजकीय पक्षांच्या भावनिक राजकारणाला नेहमीच प्राधान्य दिलं त्याची किंमत आज आपण मोजतोय. तुम्ही आम्ही नेहमीच या भावनांच्या राजकारणाचा बळी आजपर्यंत ठरलो. आयुष्यच जर नसेल, शरीरच नसेल तर काय आणि किती अर्थ उरतो त्या भावनांच्या राजकारणाला. पण कुणाचा पुतळा किती उंच असेल याची स्पर्धा भरवणाऱ्या आम्हां लोकांना आरोग्य यंत्रणा, रुग्णालये, शिक्षण यांचे महत्त्व समजायला खूप उशीर झाला. त्याचेच हे परिणाम. आजपर्यंत किती फालतू गोष्टींना आपण महत्त्व देत आलोय याची आपल्यालाच लाज वाटायला लागलीये. माणुसकी शिवाय मोठा धर्म नाही याची जाण होऊ लागलीये. आज कोरोना आहे, भविष्यात यांसारख्या विविध संकटांचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. त्यासाठी केवळ भावनिक राजकारण करण्यापेक्षा योग्य त्या गोष्टींना प्रथम प्राधान्य देणं गरजेचं आहे.आरोग्य, शिक्षण, रोजगार, विकास, यांसारख्या क्षेत्रांत भरीव योगदान देण्याची गरज आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधी निवडताना जर अजूनही आपण डोळे उघडे ठेवले नाहीत तर खरंच आजसारखी डोळे मिटण्याची वेळ आपल्या सर्वांवर येऊ शकते यात तिळमात्र शंका नाही..!
🖋
- विश्वजीत राळे पा.


0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.