विश्वा म्हणे..!
'वाभाडे' काढणारे 'नेमाडे'..!
भालचंद्र नेमाडे
'भालचंद्र नेमाडे'..नेहमीच चर्चेच्या, कौतुकाच्या, टीकेच्या परिघात असणारं हे नाव. 'कोसला', 'हिंदू' यांसारख्या विविध विख्यात कादंबऱ्यांतून वाचकांसमोर येणारा हा लेखक काल मला प्रत्यक्षात ऐकता आला.
हा साहित्यिक वेगळा आहे. आपले तीव्र, परखड, स्पष्ट व टोकाचे असलेले विचार, तितक्याच थेट व जलद वाणीतून समाजासमोर मांडताना तो जराही कचरत नाही. समाजातील दांभिकतेवर उघडपणे टीका करताना तो कुणाचीही भीड ठेवत नाही. उगाचंच रसाळ वाणीने कौतुक करणे हा त्याचा स्वभाव नाही. जाती- धर्माच्या भिंतींना छेद देत, प्रसंगी इतिहासातील दाखले देत हा आपले विचार मांडत असतो. यामुळे विरोधक जरी निर्माण झाले असले, तरी मोठया प्रमाणावर प्रेम करणारा चाहता वर्ग ही जमेची बाजू.
![]() |
| पुण्यातील एका कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना 'भालचंद्र नेमाडे' |
वयाच्या २५ व्या वर्षी लिहिलेल्या 'कोसला' कादंबरीसाठी 'साहित्य अकादमी'च्या पुरस्काराने गौरविण्यात आलेला किंवा 'हिंदू' कादंबरीसाठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च अशा 'ज्ञानपीठ' पुरस्काराने सन्मानित झालेला हा माणूस जेव्हा पारितोषिक वितरण समारंभ किंवा सन्मान समारंभांचे अध्यक्षस्थान भूषवत असताना समाजातील एकूणच सन्मान सोहळ्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तेव्हा मात्र आयोजक व सन्मानार्थी या दोहोंचीही पंचाईत होते. नेमाडेंविषयी थोडक्यात सांगायचंच झालं तर मी म्हणेल, 'वाभाडे काढणारे, ते नेमाडे'.
"मराठी संस्कृती ही अशी संकुचित कधीच नव्हती. हाच संकुचितपणा या मराठीला फार नडतोय. मराठी संस्कृतीची आजवर जी ख्याती होती ती दुर्दैवाने आपण घालवली", असं जेव्हा हा साहित्यिक सांगतो तेव्हा त्याचा 'मराठीभिमान', त्याचे 'मराठीप्रेम' तर दिसतेच, पण त्यामागे असणारी त्यांची खंत देखील व्यक्त होते.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मी अजून तरी 'नेमाडे' वाचला नाही; पण आता तो वाचण्याचा मोहदेखील आवरत नाही..!
त्याविषयी पुन्हा लिहिणं होईलच.
🖋
- विश्वजीत राळे पा.
विश्वा म्हणे..!
#भालचंद्र_नेमाडे #BhalchandraNemade #नेमाडे #Nemade



0 Comments
Offensive, spam comments are strictly prohibited.