राजकीय पटलावरील वाचाळवीर

राजकीय पटलावरील वाचाळवीर


 विश्वजीत राळे

विश्वा म्हणे..!





    मागील चार-पाच महिन्यांपूर्वीपासून चर्चेत असणारी 'भारत जोडो यात्रा'; कन्याकुमारी ते काश्मीर असे ऐतिहासिक मार्गक्रमण; त्यातून राहुल गांधी यांनी आपली बनलेली 'पप्पू'ची प्रतिमा नव्याने समोर आणण्यासाठी केलेला प्रयत्न; गेल्या सात-आठ वर्षांपासून डळमळीत झालेल्या काँग्रेस पक्षाला मिळालेली नवसंजीवनी अन् सारी मरगळ झटकून कामास लागलेले कार्यकर्ते. एक नवा उत्साह सगळ्यांमध्ये संचारल्याचे आपण सर्वांनी पाहिले. एवढ्या सगळ्या चांगल्या बाबी घडत असताना ही यात्रा जेव्हा महाराष्ट्र राज्यातून जात होती, त्यावेळी मात्र सावरकरांवर टीका करण्याचा मोह राहुल गांधींना आवरता आला नाही. राहुल गांधींकडे वंशपरंपरागत चालत आलेली सावरकरांना दूषणं द्यायची मागचीच 'री' पुन्हा ओढली गेली. मग मित्रपक्ष दुखावले गेले आहेत हे दाखवून देण्यासाठी हवेत शब्द झाडले गेले. ते किती दिवस टिकले आणि कधी कसे कोणत्या हवेत विरले हे त्या हवेलाच माहित!
    
    एवढा सगळा उहापोह करण्याचे कारण म्हणजे राहुल गांधी यांनी सावरकरांवर पुन्हा उधळलेली 'स्तुतीसुमने' आणि भारतीय जनता पक्षाने त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेली सावरकरांचा डीपी ठेवण्याची मोहीम. "माफी मागायला मी सावरकर नाही", असे म्हणत त्यांना मिळत असलेल्या सहानुभूतीला एक प्रकारे पुन्हा तडा जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. जनप्रक्षोभाला देखील सामोरे जावं लागत आहे.
  
  देशभरात राहुल गांधींविषयी पुन्हा एकदा सहानुभूतीचे वातावरण तयार होत असताना ही अशी विधाने पुन्हा पुन्हा करून त्यांनी काय साध्य केलं? ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं, की एका हाताने टाळी वाजत नाही त्याचप्रमाणे हे केवळ एकाच बाजूने घडतंय असं देखील नाही. निवडणुकांच्या तोंडाशी प्रचार यात्रांच्या वेळेस नेहरू-गांधी आठवतात मग. आजही त्यांना शिव्या-शाप देत मत मागण्याचे उद्योग चालू आहेत देशात. ज्यांच्या श्राद्धाला आपण जेवायला जातो निदान त्यांना तरी आपण नावं ठेवू नयेत. याचा अतिरेक तेव्हा होतो जेव्हा महाराष्ट्रासारख्या एका महान राज्याचे एक 'महामहीम(?)' राज्यपाल आपल्या सांविधानिक पदाची कसलीही कदर न बाळगता येथील राष्ट्रपुरुषांबाबत काहीही गरळ ओकतात.
    
    एकमेकांवर शिंतोडे उडवण्याच्या नादात आपण आपल्याच महापुरुषांवर कधी शिंतोडे उडवू लागलो, याचे देखील आपल्याला भान उरले नाही ही खरी शोकांतिका आहे. मुळात ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली, या देशाला गुलामगिरीच्या पाशांतून मुक्त करून स्वातंत्र्याचा अनमोल ठेवा ज्यांनी आपल्या हवाली केला. ज्यांनी आपले सारे आयुष्य वेचले, खस्ता खाल्ल्या, समाजाला एक विचार आणि दिशा देण्याचे कार्य केले, त्या महापुरुषांना शिव्या-शाप देण्याचे तर सोडाच पण त्यांच्याविषयी एक अवाक्षरदेखील काढण्याची आपली पात्रता आहे का याचा ज्याचा त्याने विचार करायला हवा.

    सामान्य नागरिक आज राजकारणाकडे एक दलदल म्हणून बघत आहे. तरुण-सळसळणारं रक्त असणारा या देशातील युवक आज राजकारणाकडे पाठ फिरवत आहे, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय असे वाचाळवीर रोज पुन्हा पुन्हा तयार होत आहेत; यासारखे दुर्दैव ते काय असू शकते? ज्या महाराष्ट्राने, ज्या देशाने या समाजाला आणि परिणामी या जगाला एक विचार देण्याचे काम केले तो महाराष्ट्र, तो हा भारत देश आज कसल्या आणि कुठल्या विचारांमध्ये बुरसटलेला आहे; ज्या कलामांनी भारताला एक महासत्ता बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले त्या कलाम यांच्या आत्म्याला आपण एकदा विचारून पहावं की आपण कोणत्या विचारसरणीकडे मार्गक्रमण करत आहोत; ज्या वाजपेयींचे "सत्ता आयेगी जायेगी मगर ये देश रहना चाहिए,इस देश का लोकतंत्र रहना चाहिए" असे बोल आजही ज्या संसदेत घुमत आहेत त्याच संसदेत महापुरुषांवर बदनामीचे डाग आपण लावताना आपण कोणता देश घडवण्याचं स्वप्न पाहत आहोत हे जरा ज्याने त्याने स्वतःशी विचारून पाहायला हवं. खरंच गरज आहे एका पारदर्शक आरशाची ज्यात एकमेकांचे चेहरे न दिसता प्रत्येकाने आपापली उधळलेली स्तुतीसुमने ज्याला त्याला दिसतील!

 

🖋

- विश्वजीत राळे 

विश्वा म्हणे..!

 
 

Post a Comment

0 Comments