गोष्ट बादशहाच्या फर्मानाची

गोष्ट बादशहाच्या फर्मानाची...

- विश्वजीत राळे


दिल्लीहून काढलेले मुघल बादशहाचे 'फर्मान' जेव्हा आपल्या दलासहित दख्खनेत येवून पोहोचत असे, त्यावेळी विजापूरचा सर्वेसर्वा असलेल्या आदिलशहाने त्या फर्मानाच्या स्वागतासाठी, त्याचा स्वीकार करण्यासाठी राज्याच्या वेशीबाहेर ३-४ कोस दूर असलेल्या 'फर्मान बावडी'पर्यंत अनवाणी पायाने चालत-चालत येण्याचा रिवाज असे. 'बावडी' म्हणजे विहीर. मग तेथे पोहोचल्यानंतर आदिलशहाला स्वतः त्या बावडीतील पाणी काढून, ज्या उंटावरून ते फर्मान आणलेले असे, त्या उंटाला पाणी पाजून त्याचा थकवा घालवण्यासाठी त्याच्या सर्वांगाहून पाणी शिंपडावे लागे. 'बादशहाचा प्रतिनिधी' म्हणून त्या उंटाला कुर्निसात करून झाला, की मग त्या उंटाच्या पाठीवर असलेल्या सोन्याच्या पेटीतील ते फर्मान पेटीसहित आपल्या डोक्यावर उचलून घेऊन पुन्हा परत आपल्या राजदरबारी अनवाणी पायाने चालत जावे लागे.

या गोष्टीतून काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत:

  • आदिलशहामध्ये मुघलांविरुद्ध लढण्याची हिंमत नसल्याने त्याला मुघल बादशहाचे मांडलिकत्व स्विकारावे लागले होते. 
  • त्याच औरंगजेब बादशहाविरुद्ध त्याच्याच राजधानीत जाऊन त्याच्याच नजरेला नजर भिडवून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याने दिलेली खिल्लत उधळून लावली, तेव्हा छत्रपती शिवरायांची ही कृती किती बाणेदारपणाची होती आणि ही घटना किती ऐतिहासिक होती याची कल्पना येते.
  • स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून मांडलिक होणे म्हणजे नक्की काय, याची प्रचिती या घटनेवरुन येते. यावरून हिंदवी स्वराज्याचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होते.


खालील फोटोत काही तत्सम फर्माने कसलेही कष्ट न घेता आपल्याला अगदी सहजपणे पाहता येतील.

____________________

विश्वजीत राळे


Post a Comment

0 Comments