पानिपत शौर्य दिन | Panipat Shaurya Din

१४ जानेवारी २०२४...गेल्या वर्षीच्या ‘पानिपत शौर्य दिना’ला मी पानिपतच्या भूमीत उभा होतो, त्याविषयी...

पानिपत शौर्य दिन


'काला आम्ब' युद्ध स्मारक

    १४ जानेवारी २०२४...गेल्या वर्षीच्या ‘पानिपत शौर्य दिना’ला मी पानिपतच्या भूमीत उभा होतो. बऱ्याच दिवसांपासून पानिपतला जाण्याची इच्छा होती. वाचलेला प्रत्येक प्रसंग नजरेसमोर उभा राहत होता. येथे सांडलेल्या मराठ्यांच्या रक्ताचा थेंब न थेंब आपल्याही रोमारोमांतून संचारल्याचा भास होत होता.

पानिपतची युद्धभूमी

    जी पाच गावं पांडवांनी दान म्हणून मागितली होती, त्यांपैकी पानिपत हे एक गाव. ‘पांडवप्रस्थ’ असा पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आढळून येतो. मात्र, पानिपतची जी ओळख आहे, ती येथे लढल्या गेलेल्या तीन     युद्धांमुळं. बाबर आणि इब्राहिम लोधी, अकबर आणि हेमचंद्र, मराठे आणि अब्दाली; अशी ही तीन युद्धं, ज्यामुळं या भारतभूमीच्या इतिहासाला कलाटणी मिळाली.

    पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे स्मरण करून देणारे ‘काला आम्ब’ या ठिकाणी असलेले युद्धस्मारक आपल्यासाठी एक अखंड प्रेरणास्त्रोत आहे. पानिपतच्या तीनही युद्धांच्या स्मृती जागृत करणारे ‘पानिपत संग्रहालय’ एकदा अवश्य पाहण्यासारखे आहे. मुघलकालीन पाऊलखुणादेखील या गावात पाहायला मिळतात. बाबरने बांधलेली ‘काबुली बाग मस्जिद’ येथे आहे. तेथून जवळच इब्राहिम लोधीची कबर आहे.



पाणिपत संग्रहालय
    पानिपत ही जखम नव्हे, तर मराठ्यांच्या शौर्याची ती कहाणी आहे. भारतभूमीवर चाल करून आलेल्या शत्रूला पुन्हा माघारी धाडण्यासाठी, भारताच्या संरक्षणार्थ महाराष्ट्राने धावून जाऊन ‘महाराष्ट्र धर्म’ म्हणजे काय, याची प्रचिती देणारी ती एक संघर्षगाथा आहे.
    येथील माती कपाळी लावून, तेथील अभिमान उराशी साठवून मग मी ही परतीची वाट धरली.

🖋

- विश्वजीत राळे 


#विश्वा_म्हणे

#VishvaaMhane

#पाणिपत #Panipat #पाणिपत_शौर्य_दिन #MarathaHistory #मराठा_इतिहास #महाराष्ट्र #मराठेशाही #स्वराज्य

Post a Comment

0 Comments